सावंतवाडीतील अद्वैत बेकहाऊसला मंत्री नितेश राणे यांची भेट; युवा उद्योजकाचे कौतुक
सावंतवाडीतील अद्वैत बेकहाऊसला मंत्री नितेश राणे यांची भेट; युवा उद्योजकाचे कौतुक
स्थानिक युवकाने मेहनतीतून उभा केला स्वतःचा ब्रँड; ‘रिव्हर्स मायग्रेशन’चे उत्तम उदाहरण असल्याचे गौरवोद्गार
सावंतवाडी :
स्थानिक युवकांनी नोकरी किंवा व्यवसायासाठी परजिल्ह्यात अथवा मोठ्या शहरांकडे धाव घेण्याऐवजी आपल्या मातीतच उद्योग उभारावेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, असे आवाहन सातत्याने केले जाते. याच विचाराला प्रत्यक्ष कृतीतून मूर्त स्वरूप देणाऱ्या सावंतवाडी येथील ‘अद्वैत बेकहाऊस’ला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बेकहाऊसमधील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत युवा उद्योजक अद्वैत याच्या मेहनतीचे आणि व्यवसायातील गुणवत्तेचे विशेष कौतुक केले.
सावंतवाडीतील अद्वैत बेकहाऊसला मंत्री नितेश राणे यांची भेट; युवा उद्योजकाचे कौतुक
एका स्थानिक युवकाने स्वतःच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर उभा केलेला ‘अद्वैत बेकहाऊस’ हा ब्रँड खरोखरच कौतुकास्पद असल्याचे राणे यांनी सांगितले. अद्वैत हा ‘रिव्हर्स मायग्रेशन’ अर्थात मोठ्या शहरांतून पुन्हा आपल्या गावाकडे येऊन व्यवसाय उभारण्याच्या संकल्पनेचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी रोजगार आणि व्यवसायासाठी बाहेरगावी जाण्याऐवजी पुन्हा आपल्या जिल्ह्यात परतावे, स्थानिक अर्थकारणाला बळ द्यावे आणि येथील खाद्यसंस्कृती, भाषा व परंपरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आम्ही सातत्याने करत असतो. अद्वैतने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून हा विचार प्रत्यक्षात उतरवला आहे, असे राणे म्हणाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अद्वैतच्या कामाबद्दल यापूर्वीच कौतुक ऐकले होते. मात्र, प्रत्यक्ष भेट देऊन विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेची खात्री पटली. मुंबई आणि पुण्यातील दर्जेदार उत्पादनांनाही मागे टाकतील, अशा गुणवत्तेचे खाद्यपदार्थ येथे तयार होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अद्वैतच्या या यशस्वी प्रवासात त्याच्या आई-वडिलांचे आशीर्वाद आणि पाठबळही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांनी सावंतवाडी येथे आल्यास ‘अद्वैत बेकहाऊस’ला आवर्जून भेट द्यावी आणि या युवा उद्योजकाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.