गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी ९ डिसेंबरला नागपुरात राज्यव्यापी आंदोलन; तयारीसाठी उद्या ओरोस येथे जाहीर सभा
गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी ९ डिसेंबरला नागपुरात राज्यव्यापी आंदोलन; तयारीसाठी उद्या ओरोस येथे जाहीर सभा
कणकवली :
मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार, ९ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर येथे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात गिरणी कामगारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही सभा होणार आहे.
संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे सिंधुदुर्ग चळवळीचे कार्याध्यक्ष रमाकांत बने हे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती चळवळीच्या गिरणी कामगार विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मंगेश नेवगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मुंबईतील गिरण्यांमध्ये आयुष्य वेचलेल्या हजारो गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाकडे १ लाख ७४ हजार १०२ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी सदनिकांसाठी अर्ज केले आहेत. मात्र, शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ १५ हजार ८०० सदनिकांचे वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळावे, सदनिकांसाठी अर्ज करू न शकलेल्या कामगारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी द्यावी, १९८१ च्या ऐतिहासिक संपातील कामगारांचा पुनर्वसन योजनेत समावेश करावा, संक्रमण शिबिरांमधील रिक्त घरे तातडीने वितरित करावीत, खोट्या संमतीपत्रांची छाननी करून ती रद्द करावीत, तसेच बॉम्बे डाईंग आणि न्यू पेट मिलमधील घरांची सोडत त्वरित काढावी, अशा विविध मागण्या आंदोलनाद्वारे मांडण्यात येणार आहेत.
या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्याच्या यशस्वी नियोजनासाठी ओरोस येथील सभेत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर, ओरोस येथे उपस्थित राहून सभेत सहभागी व्हावे आणि नागपूर येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.