WhatsApp Web वापरताना सरकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे - केंद्रीय गृह मंत्रालयाचा सायबर सुरक्षेबाबत इशारा
WhatsApp Web वापरताना सरकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे – केंद्रीय गृह मंत्रालयाचा सायबर सुरक्षेबाबत इशारा
नवी दिल्ली :
शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा (WhatsApp Web) वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका असल्याचे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने निदर्शनास आणून दिले आहे.
सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होऊ शकते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे गोपनीय माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे.
शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणेही टाळावे.
व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. डिजिटल माध्यमातून संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.