६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा मुंबईत उत्साहात शुभारंभ!
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ चा शुभारंभ १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत उत्साहात संपन्न झाला. गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर आणि माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर या दोन केंद्रांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्य संघ मंदिर येथे ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते मिलिंद पेडणेकर आणि गीतकार, कवी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यकारी अधिकारी विनय शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमिषा किरण वालावलकर यांनी केले.

यशवंत नाट्य मंदिर येथे ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप दळवी, रंगभूषाकार व नेपथ्यकार सुनील देवळेकर आणि अभिनेत्री चिन्मयी मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मच्छिंद्र पाटील यांनी मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये यांनी केले.
साहित्य संघ मंदिर येथे १६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान २१, तर यशवंत नाट्य मंदिर येथे १६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान १९ नाट्यकलाकृती सादर होणार आहेत.
साहित्य संघ केंद्राचे परीक्षक म्हणून संयुक्ता थोरात (नागपूर), चंद्रकांत जाडकर (नाशिक) आणि अरुण मेहता (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यशवंत नाट्य मंदिर केंद्राचे परीक्षक म्हणून *नरेश डोंगरवार, रूपाली कोंडेवार (नागपूर) आणि मदन दंडगे (कोल्हापूर) काम पाहणार आहेत.
यंदा राज्यभरातील २४ पैकी २३ केंद्रांवर एकूण ५३४ नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. ठाणे केंद्रावरील स्पर्धा नाट्यगृहाच्या दुरुस्तीमुळे डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील दोन्ही केंद्रांवर मिळून एकूण ४० नाट्यकलाकृती रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
गेली ६४ वर्षे नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा मराठी रंगभूमीच्या विकासातील महत्त्वाचा उपक्रम ठरली आहे. हौशी रंगकर्मींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


