‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ लाखांचा निधी संकलित

0
8
‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ लाखांचा निधी संकलित
‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ लाखांचा निधी संकलित

स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ लाखांचा निधी संकलित!

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार प्रमोद जठार यांच्या कोकण विकासाच्या बारा संकल्पांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची, दूरदृष्टीची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा ‘स्वराज्याचा सागरध्वज’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात संपन्न झाला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, या सांस्कृतिक सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल १२ लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिषजी शेलार यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना आमदार श्री. प्रमोदजी जठार यांची होती, तर कोकण विकास आघाडी, मुंबईचे श्री. सुहास अडीवरेकर हे कार्यक्रमाचे संयोजक होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिषजी शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर, आमदार श्री. महेशजी बालदी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजी राजे आंग्रे, स्वीकृत नगरसेवक श्री. कमलाकर दळवी, माजी आमदार श्री. भाई गिरकर आणि भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती अक्षता तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणांपैकी एक म्हणजे आमदार श्री. प्रमोदजी जठार यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या बारा संकल्पांची माहिती असलेल्या विशेष दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध संकल्पना, विकासाची दिशा आणि भविष्यातील उद्दिष्टे जनतेसमोर मांडण्यात आली.
‘स्वराज्याचा सागरध्वज’ या सांगीतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी दूरदृष्टी, आरमाराची उभारणी, सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती, समुद्रावरील स्वराज्याचे सामर्थ्य आणि मराठ्यांच्या शौर्याची गाथा संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आली. शिवकालीन इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंग, स्वराज्याची प्रेरणा आणि मराठी अस्मितेचा जागर यांचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
प्रसिद्ध गायक नंदेश उमप, केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई आणि जितेंद्र तुपे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने आणि प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. शिवकालीन पराक्रम, स्वराज्याचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी भरून गेले होते.
यावेळी इतिहास संशोधक डॉ. ज्योती तोरस्कर आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. इतिहास आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १२ लाखांचा निधी!

या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिक, रसिक आणि उपस्थित मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल १२ लाख रुपयांचा निधी जमा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गौरव करतानाच संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी समाजाने पुढाकार घेणे, ही या कार्यक्रमाची विशेष उपलब्धी ठरली.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुप्रसिद्ध संगीतकार कमलेश भडकमकर यांनी केले. निवेदनाची जबाबदारी मंदार खराडे यांनी समर्थपणे सांभाळली, तर कार्यक्रमाची संहिता अंबर हडप यांनी लिहिली होती. ध्वनी संयोजन विराज भोसले, प्रकाशयोजना विलास हुमणे, छायाचित्रण नितेश चारी आणि नेपथ्य श्री. तारकर यांनी सांभाळले.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भावेश मथुरिया, रजनीश राणे, सुनील खाडये, अभिजीत जोशी आणि विजय राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी सामर्थ्य, कोकणच्या विकासाचे बारा संकल्प, सांस्कृतिक वैभव आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संकलित झालेला १२ लाखांचा मदतनिधी अशा विविध पैलूंचा सुंदर संगम ‘स्वराज्याचा सागरध्वज’ या कार्यक्रमातून घडून आला. इतिहासाचा अभिमान, कोकणच्या विकासाची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here