संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत पत्रकारांना भेट; मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते वितरण
संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत पत्रकारांना भेट; मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते वितरण
कणकवली :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कणकवली नगरपंचायतीच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम केलेली प्रत पत्रकारांना भेट म्हणून देण्यात आली. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते या प्रतींचे वितरण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे, वीरेंद्र चिंदरकर, दिगंबर वालावलकर, राजा दळवी, उमेश बुचडे, तुषार हजारे, विराज गोसावी आणि साईल बागवे यांना संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फ्रेम भेट देण्यात आल्या.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानातील मूल्ये, लोकशाही तत्त्वे आणि नागरिकांचे अधिकार यांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने नगरपंचायतीच्या वतीने शहरातील नागरिकांनाही संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतींचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम उपस्थित होते. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत.