सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली असून, या भूमीने अनेक गुणी कलाकार घडवून त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली आहे. अशा स्थानिक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा संकल्प कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. देवदिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कणकवलीतील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात आयोजित ‘दिवाळी इली फराळाक येवा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यापूर्वी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने कणकवलीतील मराठा मंडळ येथे ‘विठू माऊली आणि ज्ञानेश्वर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरात आणखी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कणकवलीत करण्यात आल्याने स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे पारकर यांनी सांगितले. कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम म्हणजे त्यांच्या कलेचा खऱ्या अर्थाने सन्मान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांनी संगीत, नाटक, अभिनय आणि विविध लोककलांच्या माध्यमातून राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळणे आणि त्यांच्या कलागुणांना रसिकांसमोर आणणे महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल संदेश पारकर यांनी त्यांचे आभार मानले.
देवदिवाळीनिमित्त आयोजित ‘दिवाळी इली फराळाक येवा’ या कार्यक्रमात सुमारे ३० कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर केले. त्यांच्या संगीत, अभिनय आणि सांस्कृतिक सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कलाकारांच्या बहारदार सादरीकरणामुळे आचरेकर प्रतिष्ठानचे नाट्यमंदिर उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष संदेश पारकर, अभिनेते दिगंबर नाईक, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पत्रकार रजनीश राणे, संजय राणे, हरिभाऊ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रमोद जठार यांनीही कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.