सिंधुदुर्ग – महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा तणाव असतो. पण या तणावामध्ये ही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. विशेषतः मानसिक आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते. कोविड काळ हा सर्वांसाठीच मोठा कठिण काळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, अजूनही आपण कोविडचा सामना करतच आहोत. विशेषतः ग्राम पातळीवर काम करणारे कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील हे रोजच कोविडसाठी काम करत आहेत. अलगीकरण, विलगीकरण, तपासणी यासाठी प्रयत्न करत असतात. महसूलचे रोजचे कर्तव्य पारपाडतच आपण आपत्तीचाही सामना करत असतो. आपत्ती काळामध्ये आपले काम महत्वाचे असते. या सर्वामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. तसे न करता आरोग्य तपासणी करणे, इतर काही आजार असल्यास त्यावर उपचार घेणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. आज पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन. हे पुरस्कार आपल्याला आणखी जोमाने काम करण्यास नक्कीच प्रोत्साहन देतील.
यावेळी भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार संजय गवस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी महसूल दिनाचे महत्व सांगताना पुरस्कार हे प्रातिनिधीक स्वरुपात असल्याचे सांगितले. या पुरस्कारातून काम करण्याची नवी ऊर्जा प्राप्त होत असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संवर्गामध्ये सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तहसिलदार संवर्गामध्ये वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे, मालवण तहसिलदार अजय पाटणे, वैभववाडी तहसिलदार रामदार झळके यांना पुरस्कार देण्यात आला. यासह नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, वाहन चालक आणि शिपाई वर्गात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनाही पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच विधी अधिकारी ॲड. संतोष सावंत, जिल्हा सूचना अधिकारी टी ॲन्थोनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सुरुवातीस कोविड मुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेले महसूलचे कर्मचारी, त्यांचे आप्त व जिल्ह्यातील नागरिकांना श्रद्धांजली वाहन्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन अव्वल कारकून श्री. वरक यांनी केले. यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, देवगड प्रांताधिकारी सुधिर पाटील, कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक यांच्यासह महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.