अमेरिकेने अखेर काबूल स्फोटाचा बदला घेतला आहे. अमेरिनेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. अमेरिकेने मानवरहित विमानांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे तळ असलेल्या नानगहर प्रांतावर बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यामध्ये काबूल स्फोटाच्या मास्टर माईंडचा खात्मा झाला असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 95 अफगाणी नागरिक आणि 13 अमेरिकेचे सैनिक ठार झाले. या हल्ल्यामध्ये आपले सैनिक ठार झाल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतप्त झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली होती. त्यानंतर काबूल स्फोटाच्या हल्लेखोरांना धडा शिकवू असे अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी सांगितले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले की, ‘हा मानवविरहित हल्ला होता. अफगाणिस्तानमधील नानगहर प्रांतात हा हल्ला करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार आम्हाला आमचे लक्ष्य साध्य करण्यात यश आले असून आम्ही हल्लेखोरोचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात एकाही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही.’ दरम्यान, या हल्ल्यामुळे इसिसचे नेमकं किती नुकसान झाले याची माहिती समोर आली नसली तरी सुद्धा या हल्ल्याच काबूल हल्ल्याच्या (Kabul Attack) मास्टर माईंडचा खात्मा झाला असल्याचे सांगितले जात आहे.


