कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शनक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, एकत्र येऊन गोविंदा गटांनी मनोरे उभे करून दहिहंडी उत्सव साजरा करू नये, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट नुकतीच ओसरत आहे.राज्यात नुकतेच निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. राज्याचे अर्थचक्र पुन्हा एकदा सुरु होत असून गती घेत आहे.दोन वर्ष आपण खूप संयम पाळला आहे.त्यामुळे येणारे कोणतेही सण सार्वजनिक पद्धतीने साजरे न करता घरगुती स्वरूपात साजरे करावेत आणि स्वतःचे आणि इतरांचे कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण करून नियम पाळावेत असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुजाण नागरिकांना केले आहे.
- घरातच पूजा-आरती करून दहिहंडी उत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक पूजा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे दहिहंडी उत्सव एकत्रित साजरा करू नये. गर्दी टाळावी. दहिहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मानवी मनोरे रचू नये. दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे सामाजिक उपक्रम राबवावेत. दहिहंडी उत्सवात गर्दी झाल्यास कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.