बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा पुढील प्रवास पश्चिम-उत्तर- पश्चिम दिशेने होण्याची शक्यता आहे. याचमुळे पश्चिम किनारपट्टी भागामध्ये पुढचे तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याव्यतिरिक्त घाट परिसरामध्ये देखील मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
13 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, 16 सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा जोर किंचितसा कमी होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे