कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा व शीख धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थल हेमकुंड साहिबच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे शनिवार पासून या यात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे चारधाममध्ये पुन्हा भाविक आल्यामुळे शनिवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच बाजार फुलले हाेते. हाॅटेल, स्टे हाेम व इतर प्रतिष्ठाने सुरू झाली हाेती. धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर जयघाेष निनादत हाेते. यात्रेबद्दलचा लाेकांचा उत्साह दिसून येत हाेता. पहिल्या दिवशी चारधाममध्ये १२७६ भाविकांनी दर्शन घेतले.
बुधवारी नैनिताल उच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या शपथपत्रावर सुनावणी करताना यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले हाेते.देवस्थानम बाेर्डने गर्भगृहात प्रवेशाची परवानगी दिलेली नाही.गंगाेत्री धाममध्ये लाेकांनी काेविड नियमांचे पालन करताना माता गंगेची विशेष पूजा करण्यात आली. काही दिवसांत भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे चारधाममधील व्यापार पुन्हा रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे असे गंगाेत्री मंदिर समितीचे सचिव राजेश सेमवार म्हणाले.


