निर्यात करताना उद्योजकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना- जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

0
89

सिंधुदुर्ग -निर्यात करताना उद्योजकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून यावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. अमृतमहोत्सव वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन आज झाले. या संमेनात जिल्हा अग्रणी बँक, वस्तू व सेवा कर विभाग, एम्पेडा व जिल्हा उद्योग केंद्र यांनी निर्यांत विषयक विविध विषयावर उपस्थितांना माहिती दिली.

निर्यात व्यवसाय कसा सुरु करावा, त्यासाठी उपलब्ध विविध सवलती, वित्त पुरवठ्यासाठीच्या योजना, याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे माहिती दिली. जिल्हा निर्यात प्रचलन समितीमार्फत हाती घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातून परदेशामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, आंबा, काजू, बांबू, इत्यादी निर्यात करणाऱ्या उद्योजकांनी त्यांना निर्यात करताना सध्या येणाऱ्या अडचणी व त्या अपेक्षित उपायायोजनांबाबत आपले अभिप्राय व्यक्त केले. या सर्व अडचणींची दखल घेऊन, जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून यावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदिपकुमार प्रामाणिक, वस्तू व सेवा कर विभाच्या श्रीमती गवाणकर, एम्पेडा मुंबईचे मंगेश तावडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी. के. गावडे आणि निर्यातदार, उद्योजक व आंबा बागायतदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here