कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलां तातडीने वारस प्रमाणपत्र द्यावी-निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड

0
103

सिंधुदुर्ग– कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत विधी व सेवा प्राधिकरण तसेच तहसिलदार यांनी तातडीने वारस प्रमाणपत्र द्यावीत जेणेकरून या मुलांना शासनाच्या योजनेचा लाभ देता येईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली.

कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 229 असून दोन्ही पालक मयत बालके 16 आहेत. 314 विधवा असून 245 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व 16 बालकांची खाती उघडण्यात आली आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, बालक तसेच विधवांना शासनाच्या योजनांचे विविध लाभ देण्यासाठी त्यांची प्रलंबित प्रमाणपत्रे त्वरीत मिळवावीत. मिशन वात्सल्य योजनेंतर्गत या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी परिवीक्षिका, अंगणवाडी सेविकांनी गृहभेटी द्याव्यात. माविमने केलेल्या सर्वेक्षणाची यादी घेऊन त्याबाबतही खातरजमा करावी असेही ते म्हणाले. 

बैठकीला पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, परिवीक्षा अधिकारी बी.जी.काटकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here