मुंबई : राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. शहरीभागात इयत्ता 8 वी ते 12 आणि ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहे. दरम्यान, मुंबईत दिवसाआड शाळा भरणार आहे. एका वर्गात फक्त 15 ते 20 विद्यार्थी बसतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज येथे दिली.मुलांची हजेरी सक्तीची केली जाणार नाही. शाळा व्यवस्थापन समिती पालकांच्या संमतीसाठी अर्ज दिला जाईल. पालकांच्या संमतीपत्रानंतर त्यांच्या मुलांना शाळेत घेतले जाईल. एका बेंचवर एकच मुलगा बसेल. मुलांना मास्क, सॅनिटायझर पालिका देईल. सर्व शिक्षकांचे डोस पूर्ण झालेत. एखाद्या वर्गातील सर्वच मुलांच्या पालकांनी संमती दिल्यास, असे वर्ग अल्टरनेट डे चालवले जातील, असे महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
पण राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. याबाबात आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सा मंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शैक्षणिक वर्ष दिवाळीनंतरच सुरु होईल अशी परिस्थिती आहे. त्यावेळी किती टक्क्यांवर महाविद्यालयं सुरु करायचा याचा विचार केला जाईल. पण कॉलेज सुरु करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
कॉलेज सुरु करताना पालकांच्या हमीपत्राची आवश्यकता नाही, विद्यार्थ्यांनी यायचं की नाही हे सक्तीचं असणार नाही. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अजूनही कोविडची भीती आहे. त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये यावं अशी रचना आम्ही करणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्यापद्धतीने निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती कमी झालेली आहे, काही जिल्ह्यांमध्ये शुन्य रुग्णसंख्या आहे, अशा जिल्ह्यात कॉलेज सुरु करायची का याबाबत विचार सुरु आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्या ठिकाणी कॉलेज सुरु करायला हरकत नाही, पण ते करत असताना मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सशी चर्चा करुनच पुढचा निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.


