ललीत पंचमीला दरवर्षीप्रमाणे होणा-या हजारो भाविकांची गर्दी असते. मात्र ही गर्दी टाळून यंदा मोजक्या मानक-यांच्या उपस्थित रविवारी त्र्यंबोली देवीच्या टेकडीवर ललित पंचमी यात्रा साजरी झाली. निधी श्रीकांत गुरव या कुमारीकेच्या हस्ते कामाक्ष राक्षसाचा (कोहाळा)चा वध होताच काही मिनीटे थरार उडाला. कोहळ्याची शकले घेण्यासाठी भाविकांची झटपट उडाली. ढकला ढकली झाली.
अवघ्या तीन मिनीटांच्या थरारानंतर पून्हा विधी, पूजेचे सूर मंदिर गाभा-यात घुमु लागला. त्यानंतर त्र्यंबोली देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले. शहरालगतच्यात टेकडीवरील त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी अंबाबाई, तुळजाभवानी देवीच्या पालख्या सजवलेल्या रथातून आणण्यात आल्या. त्या पाठोपोठ महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, राजकुमार यशराजे छत्रपती यांचे आगमन झाले. त्यांच्या उपस्थित आरती व धार्मिक विधी झाले. कुमारीका निधी हीच्या हस्ते कोहळा पूजन झाले. कामाक्ष राक्षसाचा वध देवी करते, त्याचे प्रतिक म्हणून या कुमारीकेच्या हस्ते कोहळा फुटताच उपस्थित भाविकांची शकल घेण्यासाठी झुंबड उडाली. तशी ललिता पंचमी यात्रा साजरी झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोजक्या मानक-यांना टेकडीवर तसेच मंदिरात प्रवेश दिला. कोहळा पूजन विधी वेळी मोजकेच भाविक मानकरी उपस्थित होते. मंदिराच्या प्रवेशव्दारावर शेकडो भाविक कोहळा पंचमी सोहळ्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने थांबून होते.