भारत सरकारने “यंग सायंटिस्ट ऑफ द इयर २०१९’ पुरस्कार सोलापूरच्या भीमाशंकर गुरव यांना दिल्ली येथे ४ ऑक्टोबर रोजी दिला.भीमाशंकर गुरव यांनी क्षेपणास्त्र आणि ते डागण्यासाठी जे प्लॅटफॉर्म लागते त्या लाँचरचे भरीव संशोधन विकसित केले आहे. गुरव मुळचे अक्कलकोट येथील रहिवासी आहेत.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन (DRDO) अंकित पुणे येथील आयुध अनुसंधान आणि विकास संस्थापनचे ( एआरडीई ) गुरव हे जॉइंट डायरेक्टर आहेत. वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी जॉइंट डायरेक्टर होणारे भारतातील तरुण शास्त्रज्ञ आहेत.सशस्त्र सैन्यांच्या साधन संशोधन आणि निर्मितीसाठी देशभरात अशा एकूण ४२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. भारतीय सैन्य सेवारत असलेल्या ठिकाणच्या हवामानानुसार लागणारी वस्त्रे, बूट, शिरस्त्राणे, औषधे, अन्न, दैनंदिन आवश्यक असलेली साधने आणि शस्त्रांचे संशोधन करून त्याची निर्मिती डीआरडीओ करते.
पुण्याच्या एआरडीईमध्ये पिनाक क्षेपणास्त्र प्रणालीवर झालेले संशोधन मोलाची कामगिरी आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतराचे अचूक लक्ष्य भेदणे हे पिनाक क्षेपणास्त्राचे वैशिष्ट आहे.


