प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
खेड- आगामी काळात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मोठे उद्योग येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, हे बाब समाधानकारक आहे. येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी उद्योजक येण्यास उत्सुक असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत बसवण्यात आलेल्या एअर मॉनेटरिंग सिस्टीमच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
औद्योगिक वसाहतीमंध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या की देश परदेशातील मोठ मोठे उद्योजक त्या औद्योगिक वसाहतींकडे आकर्षित होतात. कोकण किनारपट्टी लागत असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये आता आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण होत असल्याने या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक यायला उत्सुक आहेत. सिंधुदुर्गात आता विमान सुविधा उपलब्ध झाली असल्याने त्याचाही फायदा उद्योजकांना होणार आहे.
औद्योगिक वसाहतीत बसवण्यात आलेल्या एअर मॉनेटरिंग सिस्टीममुळे हवेत कोणत्या वायूचे किती प्रमाण आहे याचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. कोणत्या कारखान्यातून कोणता वायू हवेत सोडला जातो हे या सिस्टीममुळे कळणार आहे. ही सिस्टीम थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी जोडण्यात आली असल्याने वायू प्रदूषणावर तातडीने उपाय योजना करण्यात येणे शक्य होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.