ऐन दिवाळीत टॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीला एक दुःखद धक्का बसला आहे.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा नायक पुनीत राजकुमार यांचे अचानक निधन झाले आहे. 46 वर्षीय पुनित राजकुमारला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले.
पुनित राजकुमार हा दिग्गज अभिनेता राजकुमार आणि पर्वताम्मा यांचा मुलगा होता. त्याने 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात काम केले आहे. अभी, अप्पू, वीरा कन्नडिगा, अजय, अरासु, राम, हुडुगारु आणि अंजनी पुत्र या सुपरहिट चित्रपटात त्याने काम केले आहे. त्याचा अखेरचा चित्रपट युवारत्न काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. बालकलाकार म्हणून त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पुनित राजकुमारच्या छातीत अचानक दुखू लागले. त्याला तात्काळ बंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या एका टीमच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु होते. पण अचानक त्याचे निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करत पुनितचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
पुनीत राजकुमार याच्या निधनानं टॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई हे पुनीत राजकुमार याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम हॉस्पिटल पोहचले होते.क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी पुनित राजकुमार याच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पुनीत राजकुमारच्या अचानक निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.