भारतीय हवामान विभागाने कालच पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोवा भागात पुढील सात दिवस पाऊस होणार असल्याचे वर्तविले होते. तसेच आता मुंबईपासून ८०० किमी अंतरावर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ४८ तासांत जोर कमी होऊन वायव्य भागात वाढेल. यामुळे ८-९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात ५०-७० किमी वेगाने वारे वाहतील असा इशारा दिला आहे.तामिळनाडू व आंध्रच्या किनाऱ्यावर पूर्व किनारपट्टी भागात चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे ९ नोव्हेंबरपर्यंत पूर्व किनारपट्टीवर आणि त्यानंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन १०-११ तारखेला अतिवृष्टीची शक्यता आहे.दक्षिण भागात आलेल्या ईशान्यकडील मान्सूनमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईसह तामिळनाडूच्या ११ जिल्ह्यांत २० सेंटिमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. चेन्नई, तिरुवेल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्थांना सोमवार आणि मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली.


