शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे 100 व्या वर्षी निधन

0
120

महाराष्ट्राच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे घरात पाय घसरुन पडले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आय सी युमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले होते. उपचार सुरु असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांचे निधन झाले’. आज सकाळी साडे आठ वाजता त्यांचे पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची आणि महाराष्ट्राने आज आपला एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे होते. त्यांचा जन्म जुलै 1922 मध्ये झाला होता. बाबासाहेब पुरंदरे पुणे जिल्ह्यातील सासवड या मूळ गावचे होते. पण ते पुण्यातच स्थायिक झाले होते. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे काम केले. भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून त्यांनी इतिहास संशोधनाच्या कामाला सुरुवात केली होती. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय ललित कादंबरी लेखन, नाट्यलंखनही त्यांनी केले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 पर्यंत 12 हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here