बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था,शाळा,विद्यालयांकडून प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

0
196

सिंधुदुर्ग- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था,शाळा,विद्यालयांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

18 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 फेब्रुवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालनाटय स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2022 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. बालनाट्य व दिव्यांग बालनाटय स्पर्धेकरिता रु.1,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका व नियम शासनाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात. मुंबई व कोकण विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील.

नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या राज्यातील नाटय संस्थांनी दिव्यांग बालनाटय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कळविले आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here