मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यास पुढाकार घेतला आहे.या मोहिमेचे नाव ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम” असे आहे.मुंबईत 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे असे अमित ठाकरे त्यांनी सांगितले असून सगळ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबी असलेला समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्याची निगा आपण राखत नाही म्हणजेच आपण कुठेतरी कमी पडतो आहे,असे मला वाटते. आपल्या सर्वांनाच कुठे ना कुठेतरी वाटत असेल, परदेशात समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर का असतात? आणि आपल्या राज्यात ते का असू शकत नाही? आपण सर्वांनी एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. फक्त सरकारवर अवलंबून न राहता, आपल्याला जबाबदारी घेणे गरजेचे आहे. जगभरातील विविध देशांत समुद्र आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला आहे.जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीने हे समुद्र किनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!” असे म्हणत समुद्र स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


