नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका देशातून दुस-या देशात हा व्हेरिएंट पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, ओमिक्रॉनच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होण्याअगोदरच स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. परंतु कधीपर्यंत ही वाहतूक बंद राहणार, याबाबत निर्णय घेतला नव्हता. त्यावर आज यासंबंधीची घोषणा करण्यात आली असून, आता विमानाची कमर्शियल सेवा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या देशातील वाढत्या रुग्णसंख्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कमर्शियल आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक ३१ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहू आणि डीजीसीए मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. विविध हवाई मार्गांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परिस्थितीनुसार मंजुरी दिली जाऊ शकते, असे परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोनाची जागतिक परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने तातडीने आदेश काढल्यामुळे भारतात येणा-या आणि भारतातून परदेशात जाण्याचा प्लॅन करणा-यांना आता त्यांचे नियोजन बदलावे लागणार आहे. कोविड-१९ च्या संसर्गामुळे भारतात येणारी आणि भारतातून जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे २३ मार्च २०२० पासून बंद आहेत.कार्गो सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे काही खास विमानफे-यांना परवानगी देण्यात येऊ शकते, असे या आदेशात म्हटले आहे.