सिंधुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर
- ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने रत्नागिरी, बारामती व पुणे येथे उपकेंद्र सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने त्यासाठी 33.3 कोटी रुपये निधीही दिला असून, नवीन वर्षात या केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठापर्यंत येण्याची गरज भासणार नाही.
मुक्त विद्यापीठाने सरत्या वर्षात विज्ञान शाखेतील 11 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात केली. तसेच वाणिज्य शाखेतील बीबीए हा अभ्यासक्रम सुरु करत विद्यापीठाच्या ज्ञानकक्षा अधिक विस्तारल्या. कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा शंभर टक्के यशस्वी करणारे विद्यापीठ म्हणून मुक्त विद्यापीठाचे राज्यभरात ओळख निर्माण झाली. विद्यापीठाचा नावलौकिक अधिक वाढवण्याच्यादृष्टीने आता उपकेंद्र अर्थात सब सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात रत्नागिरी, बारामती, पुणे येथे उपकेंद्र उभारले जाणार आहेत. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 33.3 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.