मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजन

0
1832

प्रतिनिधी-राहुल वर्दे
लांजा- राज्यातील सर्व स्तरांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून उत्साहात साजरा करण्याबाबत मराठी भाषा विभागाने एका शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.


राज्यात मराठी भाषेचे संवर्धन, विकास व्हावा, यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. मराठी भाषा विभाग मराठी भाषेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांना बळ देण्यासाठी कायमच तत्पर असतो. विशेषता: मराठी भाषेचा वापर सर्वच क्षेत्रात व्हावा यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहे. सन 2013 पासून दरवर्षी दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा केला जातो. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या मुख्य हेतूने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा पंधरवडा साजरा करण्यात येतो. सद्याच्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र घालण्यात आलेले निर्बंध लक्षात ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन साजरे करण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. हे कार्यक्रम साजरे करतांना सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाणी यांचा व्यापक स्वरुपात वापर करून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात यावा. सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांना सुयोग्य असलेले कार्यक्रम आयोजित करून हा “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” समारंभपूर्वक साजरा करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या कार्यक्रम करणे शक्य आहे, त्या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या कोविड प्रतिबंधक सूचनांचे तसेच मार्गदर्शनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या पंधरवडयादरम्यान विविध मराठी भाषेतील तज्ञ, नामवंत व्यक्ती, लेखक यांचे परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबीरांचे आयोजन, मराठी भाषेसंबंधीत प्रश्नमंजुषा, निबंध, कविता लेखन, वक्तृव स्पर्धाचे आयोजन, ग्रंथ प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आधुनिक प्रसार माध्यमांमधून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करावी.


शासकीय कार्यालयांमध्ये टंकलेखनाकरीता युनिकोड मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करावे, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरूण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन, ऑनलाईन पुस्तक विक्री, शॉट फिल्म डॉक्युमेंन्टरी लेखन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.


महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता 100 टक्के शासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर त्रिभाषा सुत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय आणि सार्वजनिक उपक्रमांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. राज्यात तसेच जिल्हास्तरावर त्यांच्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करावेत व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून उत्साहात साजरा करावा. असे आदेश मराठी भाषा विभागामार्फत देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here