प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग: दरवर्षी हिवाळय़ाच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा हंगाम यंदा मात्र बदलत्या हवामानामुळे लांबला असल्याचे अनुभवाला येत आहे. मंडणगड तालुक्यातील ‘कासवांचं गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळाससह रत्नागिरी जिल्ह्यातील १८ ठिकाणी या जातीची कासवे दरवर्षी मोठय़ा प्रमाणात येऊन अंडी घालतात आणि सुमारे ४५ ते ५५ दिवसांनी त्यातून पिल्ले बाहेर पडून समुद्राच्या दिशेने झेपावताना, असे दृश्य या सर्व ठिकाणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून दिसू लागते. पण या वर्षी अजूनही कासवे आलीच नसल्याचे येथील निसर्गप्रेमीनी सांगितले.
राज्याचा वन विभाग आणि सागरी पर्यावरणाचे जतन करण्यासाठी स्थापन झालेल्या कांदळवन विभागाचे तज्ज्ञ कोकणातील सागरकिनाऱ्यांवर या कासवांच्या विणीच्या हंगामात विशेष मार्गदर्शन करतात. त्यामुळे सर्व ठिकाणी या कासवांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन होऊ लागले आहे. पण अशा प्रकारे विणीचा हंगाम लांबणीवर पडू लागल्याने हवामानातील बदल आणि सागरी पर्यावरणाची हानी धोक्याच्या पातळीला पोचली असल्याची साधार भीती या मोहिमेत सहभागी कासवमित्रांना वाटू लागली आहे.


