प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- तुमचे कार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे, यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर सांगा असे एका महिलेने फोनवरून सांगत ओटीपीच्या सहाय्याने लाखो रुपयांना ऑनलाईन फसवल्याचा प्रकार चिपळूण येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जगन्नाथ मिसाळ (55, रा. वहाळ, घडशीवाडी चिपळूण) यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेने फोन करून तुमचे क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशनसाठी आले आहे तुमचा क्रेडिट कार्ड नंबर सांगा त्यानंतर मिसाळ यांनी क्रेडिट कार्डचा नंबर दिला. महिलेने त्यांचा विश्वास संपादन करून ओटीपी नंबर देण्यास सांगितले. मिसाळ यांनी चार वेळा ओटीपी नंबर दिल्यानंतर अनोळखी महिलेने टप्प्याटप्प्याने 1 लाख 4 हजार 610 रुपये क्रेडिट कार्डमधून ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संजय मिसाळ यांनी सावर्डे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्या नुसार पोलिसांनी अज्ञात महिलेवर भादंवी कलम 420 नुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.


