कोल्हापुर: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती.पण त्यांना दोन दिवसापासून थोडी अस्वस्थता जाणवत होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. त्यामुळे एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी हे शिक्षण घेतलं होतं. त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कार ,राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार ,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड डी.लीट.पदवी, देण्यात आली होती.


