किराणा दुकानात आला दारूचा माल अन्…’, आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून उडवली ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली

0
44

मुंबई- राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे.

‘किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल…’, अशा काव्यमय शब्दात रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
राजभवनात आज पर्यावरण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना पर्यावरण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या सोहळ्याला रामदास आठवले देखील उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर टीका केली. किराणा दुकानात आला दारूचा माल…लोकांचे होणार हाल.. अशा कवितेच्या ओळी ऐकवत त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शवला. सरकारच्या या निर्णयाविरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.

राज्य सरकाराच्या निर्णयावर भाजपाने टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.

“जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत फडणवीस खुलासा करतील. त्यामुळेच संजय राऊत ‘झिंग झिंग झिंगाट’ झाले आहेत. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का, की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार असून परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना परवानगी नसेल”, असा सवाल पडळकरांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांना केला.
“जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागले नव्हतं ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागलं. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला”, असा आरोप त्यांनी केला.
“शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात सोसलं आणि त्याची त्यांनी खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत”, असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here