सिंधुदुर्ग– महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समित्यांमार्फत विधी सेवांविषयी जनजागृती करण्यासाठी विधी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
तालुका विधी सेवा समितीमार्फत प्रत्येक गावामध्ये कायदेविषयक जनजागृती करणे, दुर्बल घटकांना विधी सहाय्य मिळण्यासाठी मदत करणे, प्रधिकरणामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे. तसेच पोलीस स्टेशन व कारागृहातील लिगल एड क्लिनिकमध्ये विधी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी सन 2022 – 23 करिता विधी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक, समाजसेवा शाखेचे विद्यार्थी ( MSW), अंगणवाडी कार्यकर्ते, कायद्याचे विद्यार्थी, बिगर शासकीय स्वयंसंस्थेचे सदस्य, बचतगटातील व्यक्ती, किमान दहावी शिक्षण पूर्ण झालेल्या व्यक्ती या पदाकरिता अर्ज करू शकतात. त्याबाबतचे अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग तसेच तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवण, देवगड आणि दिवाणी न्यायालय क. स्तर कुडाळ व दोडामार्ग येथे उपलब्ध करुन दिले आहेत.
विधी स्वयंसेवक या पदाकरिता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी किंवा ज्याच्यावर फौजदारी खटला प्रलंबीत आहे अशा व्यक्तींना या पदासाठी अर्ज करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तरी या पदासाठीचे अर्ज दि. 21 फेब्रुवारी 2022 पूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग, ओरोस येथे तसेच तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवण, देवगड आणि दिवाणी न्यायालय क. स्तर कुडाळ व दोडामार्ग यांच्याकडे सादर करावेत.