छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

0
71

मुंबई दि. १४ :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती ) साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु, यावर्षी कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती” च्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे सर्वांवार बंधनकारक आहे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here