पत्राचाळवासियांनो हक्काच्या घरांसाठीचा संघर्ष विसरु नका, मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

0
47
सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ

मुंबई, दि.२२ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे, हे हक्काचे घर मिळविण्यासाठी जो संघर्ष केला आहे, तो विसरु नका आणि हा संघर्ष वायादेखील जाऊ देऊ नका, त्यासाठी मिळालेली ही घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्राचाळवासियांना घातली.आज हा क्षण पहायला पत्राचाळीतील जे रहिवासी आज हयात देखील नाहीत,  त्यांना मी अभिवादन करतो. पत्राचाळीचा प्रश्न सोडविण्याची मागणी घेऊन संघर्ष समितीला दिलेले वचन आज पूर्ण केले असून अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज होत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. कॅबिनेटमध्येही या विषयाला त्यांनी नेहमी वाचा फोडली असे सांगून कामं अनेक असतात, मुंबईत हक्काच घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते.

येत्या तीन वर्षात घरे ताब्यात देण्याची ग्वाही यावेळी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपल्या जमीनी कुणालाही द्यायच्या नाहीत हा निर्णय म्हाडाने घेतला असून म्हाडाच्या जमीनी उत्तमपणे विकसित करु आणि त्यातून लाखभर रहिवाशांना हक्काचे घर मिळेल,‘म्हाडा’ वर विश्वास ठेवा, असा विश्वासही डॉ. आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here