प्रतिनिधी: राहुल वर्दे (लांजा)
रत्नागिरी: संयुक्त अरब अमिराती (दुबई) सरकारने कोकणातील राजापूर तालुक्यातील दसुर गावचे तरुण उद्योजक इम्तियाज अ.रज्जाक काळसेकर यांना जिबल अली फ्री झोन परिसरात प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. या भागातील हा पहिलाच खा-या पाण्यातील कोळंबी प्रकल्प कोकणी माणसाच्या प्रयत्नातून उभारण्यात येत आहे.
जिबल अली फ्री झोन येथील सुविधांमध्ये खा-या पाण्यातील कोळंबीची शेती हॕचरी प्रक्रियेचा यात समावेश आहे.प्राईम अॕक्वा कल्चरल आर.ए.एस तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात करण्यात येणार आहे.त्यामुळे पाण्याचा अवघ्या ५ ते ७ टक्के निचरा होताना प्रकल्पातून कोळंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे. आर.ए.एस पध्दतीने कोळंबीच्या शेतीला प्राधान्य देण्यासाठी प्राईम अॕक्वा कल्चरशी करार करुन संयुक्त अरब अमिरातीची खाद्यान्न क्षमता वाढवण्यासाठी तेथील प्रशासन विविध पावले उचलत असून हा प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी काळसेकर प्रयत्न करत आहेत.यामुळे उत्पादन क्षमता वाढणार असून दुबईच्या दीर्घकालीन अन्न सुरक्षेच्या देष्टीनेही हे महत्वाचे असून अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
कोकणातील उद्योजक पैगंबरवासी अब्दुल रज्जाक काळसेकर यांचे सुपुत्र इम्तियाज काळसेकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दसूर गावचे मुळ रहिवासी असून त्यांची सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी आहे.या कोकणी तरुण उद्योजकाने परदेशातील संयुक्त अमिरातीत कोळंबी प्रकल्प उभारुन कोकणाची मुद्रा उमटवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.


