प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी– आम्ही गेली चार दिवस रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा वाईट अनुभव घेत आहोत. कधीही आणि कुठेही बॉम्बहल्ल्याचा वर्षाव होत आहे. त्याने सर्व काही उद्ध्वस्त होताना आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. भारतीय दुतावास आमच्या संपर्कात असून आम्हाला मदत मिळत आहे; मात्र सुरक्षेसाठी आम्हाला बंकरमध्ये (भूमिगत भाग) ठेवले आहे. आमच्या खाण्याची व्यवस्था होत आहे. सुरक्षित असलो तरी या युद्धाच्या भयानक परिस्थितीतून लवकरात लवकर मायदेशी जाण्याची आमची इच्छा आहे, अशी युक्रेनमधील प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या मिरकरवाडा (रत्नागिरी) येथील विद्यार्थिनी मुस्कान सोलकर यांनी व्हिडिओ कॉलवर सांगितले.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाची झळ वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बसत आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र शासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अद्वैत कदम (देवरूख), साक्षी नरोटे (देवरूख), जान्हवी शिंदे (देवरूख), ऋषभनाथ मोलाज (चिपळूण), आकाश कोगनाक (मंडणगड), सलोनी मनेर (लांजा), ऐश्वर्या सावंत (दापोली) आणि मिरकरवाडा येथील मुस्कान सोलकर या विद्यार्थिनीचा समावेश आहे. मुस्कानच्या कुटुंबीयांशी याबाबत चर्चा केली असता, ते युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रचंड घाबरले आहेत. आपली मुलगी सुखरूप मायदेशी यावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.


