मुंबई- गेल्या आठ दिवसांपूर्वी मंत्री नवाब मलिकांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर मलिकांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावणी. आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना परत न्यायालयात हजर केले होते. आज न्यायालयानं त्यांच्या कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ केली आहे.
न्यायालयात काय घडलं?
नवाब मलिकांनी ५५ लाख हसीन पारकरला दिल्याचे ईडीने म्हटले होते. पण, आता ईडीने न्यायालयात त्यांची चूक मान्य केली असून मलिकांनी ५ लाख दिल्याचे म्हटलं आहे. आमच्या टायपिंगमध्ये चूक झाल्याचं ईडीने म्हटले, असं एएसजी अनिल सिंह म्हणाले. २५ ते २८ मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे नवाब मलिकांची कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला. त्यानुसार न्यायालयानं मलिकांच्या कोठडीत वाढ केली आहे.
मलिकांचे वकील काय म्हणाले?
वकील देसाई यांनी मलिकांची बाजू मांडली. ईडी कार्यालयात घडत असलेल्या घडामोडी माध्यमांपर्यंत कशा पोहोचतात? असा सवाल उपस्थित करत अॅड. देसाई यांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मलिकांवर नेमके आरोप काय?
नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर २३ फेब्रुवारीच्या सकाळीच मलिकांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने मलिकांनी अटक केली.