मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी दिशा सालीयान आत्महत्या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे.दिंडोशी न्यायालयाकडून या दोघांनाही 10 मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं. यानंतर परत महापौरांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीची बदनामी करू नका, अशी विनंती केली. तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. यामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे या दोन्ही पिता-पुत्रांची नावे आहेत.
या प्रकरणी राणे पितापुत्रांनी पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबतची वेळ वाढवून मागितली होती. नितेश राणेना ३ मार्च तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी हजर राहण्याचं सांगितलं आहे. मात्र, त्यांनी आता पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठीची वेळ वाढवून मागितली आहे. दोघांनीही ५ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत मालवणी पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे