टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांचा “A फक्त तूच” हा चित्रपट येत आहे. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.
जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. चित्रपटाची कथा त्यांचीच असून, प्रफुल एस. चरपे यांनी पटकथा, संवाद लेखन केलं आहे.चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत.


