दाभोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी सरपंच पदासाठी पाच उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार! विद्यमान सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यात लढत होणार की अन्य उमेदवार बाजी मारणार! निवडणुकीत कुणाचे समर्थक बाजी मारणार काही वर्षांपूर्वी गावात घडलेल्या गंभीर खुन प्रकरणातील ओरोपींचे समर्थक निवडणूक रिंगणात उतरल्याने मतदारांचा कौल कुणाला? शांतताप्रिय गावात पुन्हा दहशतीचे सावट!
दाभोली ग्रामस्थांनी आवाज उठविण्याची हीच वेळ आहे. आपल्या हक्काच्या गोष्टी कोणी हिरावून घेत असेल तर त्यासाठी सर्वानी एकत्र येणे आवश्यक आहे. राजकीय धनदांडग्यांच्या पैशाच्या हव्यासापोटी गरीबांचे रहाते घर लुबाडणार्या ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीच्या माध्यमातून वेळीच आवर घातला नाहीतर वाडवडिलांनी मोठ्या कष्टाने राखलेल्या कोकणातील जमिनींवर राजकारण्यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल आणि एक दिवस कोकणातील माणूस देशोघडीला लागेल आणि त्याचे सोयरसुतकही सत्तेच्या लालसेने काम करणार्यांना रहाणार नाही. हे सत्य आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-अणसूर-येथे-मोफत-इंग्लिश/
सिंधुदुर्ग । जिल्हाप्रतिनिधी
मानवी जीवनात पैशाला इतके महत्त्व आलेले आहे की पैसा हेच माणसाचे सर्वस्व होऊन बसलेले आहे. पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येते इतकेच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचे सामर्थ्य पैशात आहे पैशासाठी माणसे अक्षरशः वेडीपीसी होतात आणि त्याच हव्यासापाई ते स्वतःला जीवनात हरवून बसतात. पैसा हे साधन आहे साध्य नाही ही महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळे सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजकारण ! दाभोलीग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
दाभोली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी पाच उमेदवार उभे राहिलेत. यात विद्यमान सरपंच माजी पंचायत समिती सदस्य यांच्यात लढत होईल असं वाटत असतानाच या पदासाठी आणखी तीन उमेदवार उभे करण्यात आल्याने दाभोली ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या लढतीत अधिक रंगत येणार असल्याने मतदारांचा कौल कुणाला याविषयी चर्चा नाक्या नाक्यावरच्या चाय टपरीवर चहाचा घोट रिचवित चर्चील्या जात आहेत.
चर्चेचा विषय एकच आहे पाटील समर्थकांचा! आता हे पाटील समर्थक म्हणजे नेमकं काय प्रकरण? या गोष्टीचा शोध घेतला असता असं समजलं या गावचे माजी उपसरपंच पाटील यांची उपसरपंच पदावरून पायउतार करून गावाने त्यांची गावातूनच हाकलपट्टी केली असल्याने त्यांचा दाभोली गावातील वर्चस्वाला तडा गेला आहे. त्यामुळे त्यांनी गावातीलच त्यांच्या मर्जीतील तीन उमेदवार प्रभाग एक, दोन, व तीन येथून उभे केले आहेत. यामागचा हेतु हाच की या तिघांपैकी एकाला जरी हे पद मिळालं तरी त्यांची रखडलेली गावातील कामे त्यांच्या साहाय्याने पूर्णत्वास जातील व पुन्हा दाभोली वासीयांच्या मनात भयाचे वातावरण निर्मिती करून दहशतीचे राजकारण खेळण्याचा वेगळाच डाव रचला गेला असल्याचा चर्चेचा मुख्य विषय आहे. यात किती तथ्य आहे ते दाभोली वासियच जाणो! काही वर्षांपूर्वी उपसरपंच पदाचा गैरवापर करून विनापरवानगी खुलेआम कांदळवनाची कत्तल करण्यात आली आणि खारलँड बंधार्याचा वापर करून ग्रामस्थांच्या विरोध दाबून त्यांच्याच वाडीतून रस्ता नेण्याचा रचण्यात आलेला कट आणि त्यासाठी भानुदास मोर्जे यांचा झालेला खुन! दाभोळ माजी उपसरपंच पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी मोबर येथील कांदळवनाची बेकायदेशीर कत्तल करून समुद्रसपाटीकरण करतेवेळी हा कट रचला. त्यावेळी तेथे असलेली घरेही जमीनदोस्त करून सपाटीकरण करण्याचा बेत होता पण त्यावेळी तेथील जागरूक ग्रामस्थांनी विरोध करून त्यांचा प्रयत्न हाणून पाडल्यामुळे ती घरे जमीनदोस्त होण्यापासून वाचली.
एवढेच नव्हे तर वर्षांनुवर्षे तीथे नांदत असणार्या कुटुंबांना त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत घरेच्या घरे बुलडोजर फिरवून क्षणात जमिनदोस्त- उध्वस्त केली गेली. त्यांना बेघर करण्यात आलं आणि आताही तोच माजी उपसरपंच पुन्हा एकदा प्रभाग एक दोन तीन मध्ये आपल्या मर्जीतील उमेदवार उभे करून तोच डाव पुन्हा खेळू पहातोय असा थोरामोठ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. गावातील जमिनी लँडमाफीयांच्या घशात घालण्यासाठी सुपारी घेऊन जे कृत्य त्या माजी उपसरपंचाने दोन वर्षापुर्वी केले होते त्याच प्रकरणामध्ये आज दाभोली ग्रामपंचायतमधून उभे राहीलेले प्रभाग एक, दोन, व तीन मधील उमेदवार सामील असल्याचे म्हंटले जात आहे. यासमर्थकांकरवी आपली पोळी भाजून घेण्याच्या माजी उपसरपंचाच्या कटाला दाभोली वासीय बळी पडतील असे वाटत नाही. दाभोली ग्रामपंचायतच्या अराजक कारभारामुळे केळूसकर कुटुंबावर संक्रांत आली, त्यांचे वडीलोपार्जीत घर गायब झाल्याने ‘ना घरका ना घाटका’, अशी परिस्थिती केळूसकर कुटंबांवर आली आहे. हा प्रकार दाभोल ग्राम पंचायत हद्दीत घडल्याने ग्रामपातळीवर किती ‘हीन दर्जात्मक राजकारण खेळले जाते याची प्रचिती या कुटुंबीयांना आली आहे.
हे सर्व का व कशासाठी तर कोकणातील समुद्री किनारपट्टीवरील जमिनी लॅन्डमाफीयांच्या घशात घालण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कार्यरत होते.
दाभोळवासीयांची घरे पाडून त्या जागा बड्याधोंड्यांच्या घशात घालण्यात जिल्हा परिषद अध्यक्षांसह त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्यांचाही सहभाग असल्यानेच दाभोळ गावात अराजकता माजल्याचे येथील सुजाण नागरिक नरेश बोवलेकर यांनी सांगितले आहे. दाभोल गावचे रहिवासी भगवान बाबूराव केळूसकर. रा.मोबारवाडी वय, वर्षे 75 हे गृहस्थ औषधोपचार घेण्यासाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या आपल्या मुलाकडे गेले असता त्याच्या गावातील गैरहजेरीचा गैर फायदा घेऊन त्यांचे वडीलोपार्जीत घरच दाभोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच व सचीव सदस्यांनी गायब केल्याने केळूसकर कुटंबीयाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने आपली कैफियत कोणाकडे मांडावी याच विबंचनेत भगवान बाबूराव केळूसकर सापडले होते ‘कोणी घर शोधता का घर… घर हरवले आहे’. असे नटसप्राट बेलवलकर प्रमाणे शासनाकडे विनवणी करण्याची पाळी 75 वर्षीय भगवान केळूसकर यांचेवर दाभोलीग्रामपंचायत सदस्यांनी आणली होती. दाभोल ग्रामस्थांनी त्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव घेऊन या विकृतींना आळा घालण्याची विनंती करून, प्रशासनाला वेळोवेळी जागृत करूनही प्रशासनाने वेळ मारून नेण्याचेच काम केले आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याने फीर्याद कोणाकडे मांडायची हा यक्षप्रश्न दाभोल ग्रामस्थांसमोर उभा ठाकला होता. अखेर भगवान केळूसकर यांनी दैनिक सिंधुदुर्ग समाचार मधून प्रशासनाला जाब विचारला होता. पण प्रशासनाला जाग येईल ते प्रशासन कसले?
दाभोली मोबारवाडी येथील जमीन खरेदी करून त्या घरामधील माणसे कामानिमित्त बाहेर गावी असल्याची संधी साधुन ते घर जमिनदोस्त करणारे सध्या भोगवे प्रकरणात पुन्हा जेलची हवा खात आहेत. आणि याच जेलची हवा भोगणार्या माजी उपसरपंचाचे ऋणानुबंध असलेले दाभोली ग्रामपंचायतमधुन उभे असलेले उमेदवार यांना दाभोली गाववाले स्विकारतील का? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागुन राहीले आहे. दाभोलीवासीय मतदारांची मानसिकता या निवडणूकीतून सर्व जनतेला दिसुन येण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे मत काही गावाबाहेरील पण नागरीक व्यक्त करताना ऐकू येत आहे.
वेंगुर्ले तालुक्यात ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.7) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदाच्या एकूण 104 अर्जापैकी 26 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 2 ठिकाणी सरपंच बिनविरोध झाले आहेत व 21 ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी 75 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर एकूण सदस्य पदाच्या 481मधून 50 जणांनी अर्ज मागे घेतले. बहुतांशी ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत. थेट सरपंच पदासाठी आडेली 1, अणसुर 2, होडावडा 8, कोचरा 2, मठ 2, मेढा 1, म्हापण 6, पाल 4, पालकरवाडी 5, परबवाडा 5, परुळेबाजार 2, शिरोडा 4, तुळस 1, उभादांडा 1, वजराट 2 व वेतोरे 1 इत्यादी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. तर रेडी, आसोली 3, चिपी, भोगवे 3, दाभोली 3, केळुस, कुशेवाडा, म्हापण या ग्रामपंचायतींमधून थेट सरपंच दाखल अर्जापैकी एकही अर्ज मागे घेण्यात आलेला नाही.
जमिनी लँन्डमाफियांच्या घशात घालण्यासाठी वयाच्या सत्तरीत मला माझ्या कुटुंबाला बेघर केलं !
मी दाभोली गावाचा रहिवाशी होतो. हो मी बरोबरच बोलतोय. आता मी दाभोली गावाचा रहिवाशी होतोच हे म्हणायची वेळ माझ्यावर आली आहे. ज्या गावात माझ्या कुटुंबाच्या पिढ्यान-पिढ्यांनी श्वास घेतला, तो श्वास माझ्यापासून दुरावला आहे. ज्या घरात मी जन्म घेतला, ज्या अंगणात मी खेळलो बागडलो, ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, ज्या घरात माझा छोटा संसार थाटला, ज्या समुद्राच्या येळेस तासान तास बसून मी सागराशी हितगुज केली, तो सागर माझा मित्र आज माझ्या पासून दुरावला आहे. माझं सर्वस्व स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन वयाच्या सत्तरीत मला माझ्या कुटुंबाला बेघर केलं गेलं? मला माझे घर माझ्या हयातीत तरी हवेच आहे यासाठी मी न्यायालयीन लढा देणारच आहे तरी ज्या जागेत माझे घर होते तेथील तुळशी वृंदावनला दिवाबत्ती व्हावी या हेतूने मी तशी तरतूद केली होती. पण ते तुळशी वृंदावनहि तेथून हटवण्यात आले आहे यात त्यांचा हेतू स्पष्ट आहे कसेही करून पैशाचा आणि बळाचा वापर करून त्यांना जमिनी लँन्डमाफियांच्या घशात कोंबायच्या आहेत हे माझ्या गाववासियांनी लक्षात घ्यायाला हवेय. अशा वृत्तीला आळा घाला. योग्य निर्णय घेवून योग्य उमेदवारालाच आपल बहूमुल्य मत द्या. कारण गावात सुख शांती तेव्हाच नांदेल जेव्हा निस्वार्थी उमेदवार आपण निवडून द्यायला हवा. माझ्या उतार वयात मला बेघर करून काय मिळवल यांनी ?
- भगवान बाबुराव केळुसकर