Covid-19- सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाने आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक -सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

0
93
.जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील उपस्थित होते.कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने घातलेले निर्बंध आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क राहील; मात्र कोणताही अतिरेक न करता जनतेला विनंती केली जाईल. त्याला जनतेने सहकार्य करावे नाहीतर कडक कारवाई करावी लागेल असे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीनी म्हणाल्या,”राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सिंधुदुर्गातही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोना प्रतिबंधासाठी काही कडक निर्बंध घातले आहेत. त्या नियमांचे आणि कडक निर्बंधाचे पालन करावे ही प्रत्येकाची जबाबदारी राहील. जिल्ह्यात आज रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. एकाच दिवशी 117 रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येकाने काळजी घ्यावी. शासनाचे आदेश पाळून कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करावे.जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक सण घरातच राहून अत्यंत साधेपणाने साजरे करावेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाण 10 टक्के आहे. एका दिवसात 950 एवढ्या टेस्ट घेतल्या जातात. जिल्हा रुग्णालयात 287 बेड उपलब्ध केले असून सर्व तालुक्‍यात मिळून 653 एवढे बेड उपलब्ध आहेत. प्रत्येक रुग्णाला जेवण व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. होम क्वारंटाईन रुग्णांना रोज फोनवर संपर्क करून व प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली जात आहे. टेस्ट जलदरित्या व्हावी, यासाठी आणखी एक मशीन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात येणार आहे.

अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सोमवार ते शुक्रवार खुली राहतील. अन्य दुकाने बंद राहातील. शनिवार, रविवार अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता कडकडीत बंद राहील; मात्र रुग्णांसाठी ऑटो रिक्षा व प्रवासी वाहतूक अविरत सुरू राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.करोनाविरुद्धच्या लढ्यात सरकारसोबत असल्याची व्यापारी संघटनांची संमती असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here