देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनचे कडक निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. 17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकावर मास्क घालण्याबाबत विशेष गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. या गाईडलाइन्सची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. पण आता दसरा आणि दिवाळी हे सण जवळ आले आहेत. या सणांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने 17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार गाईडलाइन्स 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहे.
रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.रेल्वे मंत्रालयाने कोरोनाला रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातलेल्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा.ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा सरकारने दिली आहे परंतु मास्कचा वापर प्रत्येकाने करावयाचा आहे.


