सिंधुदुर्ग: देशात झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या तसेच ओमोक्रिन या नव्या विषाणूचा प्रसार पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड काळजी केंद्रे सक्रीय करण्यासाठी तयारी करावी अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.याबाबत आवश्यक ती साधनसामग्री, वैद्यकीय सुविधा, औषधे, ऑक्सिजनचा साठा यांच नियोजन करावे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी पहिला डोस 100 टक्के होण्याच्या दृष्टीकोनातून सक्रीय काम करावे.त्याचबरोबर आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांची आज बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.
तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनी पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने प्रयत्न करावेत. ज्या गावात पहिला डोस राहिला असेल, अशा ठिकाणी विशेष प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या, दुसरा डोस आणि 10 तारखेनंतर बुस्टर डोस देण्याच्या तयारी बाबतही नियोजन करावे. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी मुख्याधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत नियोजन करावे. मोठ्या संख्येच्या शाळांच्या ठिकाणी त्याबाबत नियोजन करावे. इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक घेऊन टेलीमेडिसीन सुविधा सुरू करण्यात येईल. रोटरी क्लब, लायन्स क्लब यांचीही यासाठी मदत घ्यावी. त्या दृष्टीकोनातून नियोजन करावे. संभाव्य जत्रा, यात्रांच्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट करण्याबाबत यंत्रणा उभी करावी. जास्तीत जास्त चाचण्या वाढवाव्यात अशाही त्या म्हणाल्या. अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी यावेळी नियोजनाच्या दृष्टीकोनातून माहिती दिली.