covid19: दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच

0
34

कोरोना संसर्गाचाआकडा वाढतच चालला आहे. त्यातच शाळा कॉलेजच्या मुलांच्या बोर्डाच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. मात्र, १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने प्रात्यक्षिक परीक्षांसह इतर नियोजन करताना अडचणी येणार आहेत. परीक्षा कशा होणार? या चिंतेने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात आहेत.


गतवर्षी दहावी, बारावी परीक्षा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्य मापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. चालूवर्षी १५ जूनपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर ४ ऑक्टोबर २०२१ पासून शासनाच्या परवानगीने ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले.
काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. ४ मार्चला बारावी, तर १५ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होईल. राज्यभरातून दहावी, बारावीचे मिळून सुमारे ३२ लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.


बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून, श्रेणी व तोंडी परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु, १५ तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने नियोजन करताना अडचणीचे ठरणार आहे. त्यातच दहावी, बारावीच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेला नाही. यावर्षी २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. परीक्षेची काठिण्य पातळी कमी करण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात चालू शैक्षणिक वर्षात केवळ दोन महिनेच शाळा, महाविद्यालयांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले.


जूनपासून ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन, त्यानंतर जानेवारीपर्यंत ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. आता पुन्हा ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. १० ते १८ जानेवारीपर्यंत होणारी बारावीची पूर्व परीक्षा काही शाळा, महाविद्यालयांनी स्थगित केली आहे. अशीच परिस्थिती राज्यात सगळ्याच जिल्ह्यांत असल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांनी सांगितले.


बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतर्गत नियोजन करण्याचे शाळांना अधिकार आहेत. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. परंतु, त्या-त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असे शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here