मुंबई- मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागू शकतील अशी माहिती दिली.
गुरुवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ, या मुद्द्यावर चर्चा झाली. या संदर्भात मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. त्यामुळे मुंबईत पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत काल, बुधवारी 295 नव्या रुग्णांची सापडल्याची आकडेवारी मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. 12 रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.रुग्णवाढीचे प्रमाण कायम राहिल्यास मुंबईत लवकरच निर्बंध लावण्यात येतील. त्यामुळे काळजी घ्या. 100 पासून आता रुग्णसंख्या 500 पर्यंत वाढली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
सध्यस्थितीत मुंबईत एकूण 1531 रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 3973 दिवस इतका आहे. तर कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर – 0.017 टक्के आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबईतील 1042474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


