पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज (आवेदनपत्र)भरण्यासाठी १ ते ३१ २०२१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे.