Covid19 विधवा महिलांना योजनांचे लाभ देण्याबाबत तहसिलदारांनी कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
104


सिंधुदुर्ग – कोविड – 19 मुळे दोन्ही पालक मृत असणाऱ्या 18 वर्षाखालील बालकांना मदत मिळवून देण्यासाठी बँका, सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घ्यावे. त्याचबरोबर विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व तहसिलदारांनी लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यवाही करावी. त्याबाबत त्यांना पत्रव्यवहार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

कोविड – 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हाविधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, डॉ. संदेश कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी विषय वाचन करून सविस्तर माहिती दिली. कोविड 19 मुळे दोन्ही पालक मृत झालेले 18 वर्षाखालील 11 बालके असून एक पालक मृत बालके 156 आहेत. तसेच विधवा महिलांची संख्या 235 आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, विधवा महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व तहसिलदारांना पत्र पाठवावे.

बालकांना मदत देण्यासाठी सेवाभावी संस्था, बँका यांचे सहकार्य घ्यावे. बालकांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत आढावा घ्यावा. तालुकास्तरीय प्रलंबित माहिती सादर करावी. होणारी मदत अथवा मदतनिधी ही कायदेशीर प्रक्रियेद्वारे होते की नाही याबाबत लक्ष द्यावे अशी सूचना पोलीस अधिक्षक श्री.दाभाडे यांनी केली. बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे छायाचित्र वा त्यांची नावे प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध करता येणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी. यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here