पणजी- गोवा राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्म्याचे प्रमाण अधिक वाढले होते. आज (शनिवार) सकाळी १० वाजता अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला. बांबोळी, पणजी, पर्वरी, तसेच पेडणे तालुक्यातील न्हयबाग, वारखंड परिसरात पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र कामगारवर्ग वाटेतच अडकला.
गेल्या तीन दिवसांपासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पर्वरी येथे शेकडो दुचाकीस्वार अचानक आलेल्या पावसात अडकले. गोवा राज्याला लागूनअ सलेल्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, शेर्ले, मडुरा, पाडलोस, सातार्डा, आरोंदा भागातही पाऊस पडला. शेतकरी वर्गाची मात्र धांदल उडाली. तर जळाऊ लाकूड, जनावरांना लागणारे वाळलेल्या गवताचे मात्र नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.