दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत ९ ऑगस्ट क्रांतीदिन व पारंपारिक नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीदिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या तसबीरींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याच दिवशी शाळेत नागपंचमीचा सणही साजरा झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेल्या नागोबांची विधिवत पूजा करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-प्राथमिक-शिक्षक-पतपेढीत/
गोमेटा, आघाडा, तेरडा, सोन्याळी, बेल, दूर्वा, अळूचे पान आदी नागोबास प्रिय असलेल्या फुलपत्री वापरून नागोबांची पूजा झाली. यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक नागपंचमीचा सण, नाग- शेतकऱ्याचा मित्र, नाग- एक पर्यावरणरक्षक, जगात जर नागच नसते तर? आदी विषयांवर भाषणे केली. शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, मानसी सावंत आदींनी नागपंचमीचे महत्त्व व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे योगदान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर,पुनम जाधव, रेखा ढमके उपस्थित होते.