⭐गॅस गळतीमुळे शेजारील नांदिवडेमधील मधील जयगड माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मळमळ
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / जयगड-
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनी परिसरात गॅस गळतीमुळे शेजारील नांदिवडेमधील मधील जयगड माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मळमळ आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने गुरुवारी मोठी खळबळ उडाली. सध्या या घटनेतील बाधित विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जयगड मधील संपूर्ण ग्रामस्थाबरोबर विशेषतः जयगड बौद्धवाडीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून त्यांनी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तसेच जोपर्यंत प्रशासन कंपनीवर योग्य ती कारवाई करीत नाही आणि आणि शालेय मुलांच्या सुरक्षितच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत बौद्ध वाडीतील एकाही मुलाला शाळेत पाठविणार नसल्याची ठोस भूमिका जयगड बौद्धवाडीतील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ यांचे वतीने घेण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-लोकांच्या-न्याय-हक्कासा/
याबाबत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ जयगड यांचे वतीने प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जयगड चे माजी सरपंच जयगड साखरमोहल्ला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र जाधव तसेच जयगड शाखेचे अध्यक्ष सुहास सावंत, चिटणीस मंदार सावंत, सर्व कार्यकारणी, महिला मंडळ व सर्व ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, जयगड येथील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जयगड मध्ये आमच्या वाडीतील एकूण पाच बाधित मुले आहेत तर साखरी जयगड जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये एकूण 26 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु ही मोठी घटना घडल्यानंतर जोपर्यंत या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधितांकडून घेतली जात नाही तसेच प्रशासन जोपर्यंत योग्य ती कारवाई करीत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच या घटनेच्या दिवशी प्रशासनाने काय कार्यवाही केली याबाबतही लेखी खुलासा लेखी स्वरुपात जयगड शाखेने मागविला आहे. तसेच जयगड परिसरात गॅस प्रकल्प असलेल्या कंपनीला जयगड साखर मोहल्ला ग्रामपंचायतीचा आधीपासूनच विरोध होता. मात्र तरीदेखील गॅस प्रकल्प या परिसरात जयगड हायस्कूल आणि मराठी शाळेच्या अगदी जवळच्या अंतरावर सुरू करण्यात आल्याची माहिती जयगड साखर मोहल्ला ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजेंद्र जाधव यांनी दिली. तसेच जयगड मधील सर्व वाड्यांमधील ग्रामस्थ व वाडी प्रमुखांनी ही बाधित विद्यार्थ्यांच्या घटनेसंदर्भात योग्य तो विचार करण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे मत साखर मोहल्ला जयगड ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे.