कणकवली– मालवण तालुक्यातील त्रिंबक गावात दि. ३जानेवारी ते ६ जानेवारी २०२४ या कालावधीत वार्षिक डाळपस्वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्रिंबक पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या डाळपस्वारीत सहभागी व्हावे असे आवाहन त्रिंबक गावऱ्हाटी बारा पाच मानकऱ्यांसह ग्रामस्थांनी केले आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-पत्रकार-कल्/
दरवर्षी मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी ते एकादशी या काळात मालवण तालुक्यातील त्रिंबक गावात वार्षिक डाळपस्वारीचे आयोजन होते. त्रिंबक गावातील ग्रामदैवत असलेली श्री देवी सातेरी, पावणाई, विठ्ठलाई, श्री देव रामेश्वर, आकारी ब्राह्मण ही देवस्थाने गावातील रयतेच्या भेटीसाठी गावात फिरतात. पुर्वापार नियोजित कार्यक्रमानुसार आजही ही डाळपस्वारी साजरी केली जाते. या काळात गावातील भक्तजन मोठ्या श्रद्धेने देवतांच्या तरंगांचे दर्शन घेतात, वार्षिक रखवालीची ओटी भरतात. अनेकांचे नवस केले जातात, पूर्ण झालेले नवस फेडलेही जातात. नवसाला पावणारी व जागृत देवस्थाने म्हणून या ग्रामदैवतांची सर्वत्र किर्ती पसरली आहे.
डाळपस्वारीच्या काळात बाहेरगावाहूनही अनेकजण आपापल्या अडी-अडचणींतून मार्ग शोधण्यासाठी देवस्थानांच्या चरणांशी लीन होतात. डाळपस्वारीच्या काळात त्रिंबक गावात फार मोठे भक्तिमय वातावरण पहावयास मिळते. गेल्या शेकडो वर्षांपासून अखंडीत प्रथा असलेल्या वार्षिक डाळपस्वारीचा लाभ सर्व भक्तजनांनी घ्यावा असे त्रिंबक ग्रामस्थांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.